गावठी कट्टा बाळगणारे दोघ पोलिसांच्या ताब्यात.

 



पाचोरा तालुक्यातील पुनगाव शिवारातुन गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील पुनगाव येथे एका इसमाजवळ गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची गुप्त माहिती २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वास देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पो. कॉ. संदिप भोई, प्रकाश शिवदे यांचे पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले.


या पथकाला पुनगाव शिवारातील महादेव मंदिराचे अलिकडे पोल्ट्री फार्मजवळ दोन इसम फिरत असल्याचे निदर्शनास येताच पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी पथकासह सापळा रचत दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. याप्रसंगी त्यांची झडती घेतली असता त्यातील राहुल अनिल परदेशी (वय – २७) याचेजवळ गावठी बनावटीचे पिस्टल आढळुन आले. दरम्यान पथकाने त्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन मध्ये आणले.


दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून २० हजार रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाचे त्यावर काळे हॅण्डग्रीप असलेले गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास ट्रिगर दबलेले व रिकामी तसेच विना स्प्रिंगची मॅगझिन तिची मागील पट्टी निघालेले असे शस्त्र अनाधिकृतपणे बाळगल्याने राहुल अनिल परदेशी (वय – २७) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (वय – ३७) दोन्ही रा. पुनगाव ता. पाचोरा यांचेविरूद्ध भाग – ६ गु. र. नं. ३४७ / २०२३ भारतीय हत्यार कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे. या धडक कारवाईमुळे पोलिसांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.