पोलिसांची सतर्कता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर कैद्याला पकडले.
दीड वर्षांपासून खूनाच्या गुन्ह्यात जळगाव कारागृहात बंदी असलेल्या एका कैद्याने कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अवघ्या काही मिनिटात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पकडण्यात आले. विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) असे कैद्याचे नाव असून त्याच्यावर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामानंद नगर परिसरातील निवृत्ती काशिनाथ पवार हे कारागृहात शिपाई म्हणून नोकरीस आहे. कारागृहात गेल्या दीड वर्षांपासून खूनाच्या गुन्ह्यात विजय चैत्राम सावकारे हा बंदी म्हणून कोठडीत आहे. काल शनिवारी सकाळी ते संदीप अर्जुन थोरात, दिनेश दत्तू बारी, नागनाथ सुदाम येईल्वाड हे तिघे कर्मचारी कारागृहाच्या मेन गेटवर ड्युटीवर होते. साडेआठ वाजेच्या सुमारास कारागृहाचा दरवाजा बाहेरुन कोणीतरी ठोठावला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले, परंतु त्यांना कोणीही दिसून न आल्याने त्यांनी दरवाजा उघडून बघितले. याचवेळी कारागृहातील बंदी विजय सावकारे याने पोलिसाला धक्का देवून तो कारागृहाच्या मेनगेटमधून पळून गेला. पोलिस कर्मचाऱ्याने आरडाओरड करीत पळालेला बंदी विजय सावकारे याचा पाठलाग केला. याचवेळी कारागृहाकडे येत असलेले कारागृह शिपाई अनंत केंद्रकर व गणेश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यप्रवेद्वारावर बंदीला पकडले. त्यानंतर पुन्हा त्याची कारागृहात रवानगी केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.


Social Plugin