दुरुस्त केलेली दुचाकी पुन्हा खराब झाल्याने दुचाकीधारकाने केला गॅरेज मालकाचा खून.

 


चाळीसगाव तालुक्यातील बकाळ कसबे गावात दुरुस्त केलेली दुचाकी पुन्हा खराब झाल्याने दुचाकी मालक व गॅरेज मालक यांच्यात झालेल्या वादातून मारहाणीत गॅरेज चालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना  घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीत बळाळ कसबे या गावी महेश संतोष बोरसे यांचे शिवशक्ती मोटार नावाचे मोटारसायकल गॅरेज आहे. या गॅरेजवर ज्ञानेश्वर निंबा मासरे याने त्याची मोटार सायकल दुरुस्ती केली मात्र त्याच्या मोटार सायकलमधे पुन्हा बिघाड झाल्याने तो पुन्हा गॅरेजवर आला व माझी मोटार सायकल आत्ताच्या आता दुरुस्त करुन दे असा तगादा ज्ञानेश्वर मासरे याने गॅरेज मालक महेश बोरसे यांच्याकडे लावला यावेळी बोरसे यांनी ज्ञानेश्वर यांस थोडा वेळ थांब माझे काम सुरु आहे हे झाले की तुझी मोटार सायकल दुरुस्त करुन देतो असे सांगितले. मात्र ज्ञानेश्वर मासरे याला धीर नसल्यामुळे त्याने वाद घालून महेश बोरसे यास जमीनीवर आपटून जीवे ठार केले. वाद सुरु असतांना महेश बोरसे याचे वडील वाद सोडवण्यास आले होते.

त्यांना देखील ज्ञानेश्वर याने शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेप्रकरणी मयत महेश बोरसे याचे वडील संतोष तुकाराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी ज्ञानेश्वर निंबा मासरे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड हे करीत आहेत.