पोलीस कर्मचाऱ्यांनेच मला ५० लाखात जीवे ठार मारण्याची सुपारी दिली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश महेंद्र भावसार यांनी शुक्रवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवनात झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एक व्हिडीओ स्क्रीनच्या माध्यमातून सादर करून त्या व्हिडिओची माहिती दिली. हा व्हिडीओ दोंडाईचा येथील असून यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे देताना दिसत आहे. पैसे देणाऱ्या व्यक्तीचं नाव महेश बलराम रामरख्या असून पैसे घेणारा व्यक्ती प्रतीक शरद महाले आहे. या व्हिडिओतील रक्कम ४२ लाख रुपये आहे. अशी माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले दोंडाईचा येथील व्यापारी गिरधारीलाल माधवदास रामरख्या हे घरकुल योजनेतील गुन्ह्यात जेलमध्ये असताना त्यांच्या जामिनासाठी पोलीस अधिकारी हेमंत सुभाष पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी ४२ लाख रुपये गिरधारीलाल यांचा पुतण्या महेश बलराम रामरख्या हा प्रतीक शरद महाले यांना देताना व्हिडिओत दिसत आहे. असे सारांश भावसार व गिरधारीलाल रामरख्या यांनी सांगितले. तसेच यासंदर्भातील प्रतीक महाले याचा जवाबही पुरावा म्हणून सादर केला. या पत्रकार परिषदेत सारांश भावसार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल असलेले फरार आरोपी व धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे माजी पोलीस निरीक्षक व सद्यस्थितीत निलंबित असलेले अधिकारी हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या नावाचा उल्लेख करीत माझी निरर्थक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सात्वीक हेमंत पाटील यांच्याशी माझा सुईच्या टोकाइतका देखील संबंध कधी आला नाही. हेमंत पाटील यांनी विनापुरावा केलेल्या आरोपांच्या बाबत मी त्यांच्या विरोधात कायदेशीररित्या अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहे. त्यांनी केलेल्या दाव्यावर ते ठाम असतील तर त्यांनी प्रशासकीय उच्च पदावर काम करण्याची जाणीव ठेवून फरार न होता पोलीस प्रशासनास सामोरे जाऊन त्यांच्या केलेल्या दाव्यानुसार संबंधित व्हिडीओ हा डिफेक्ट असेल तर त्यासंदर्भात फॉरेन्सिक डॉक्युमेंट्स पोलीस प्रशासनाला द्यावेत. या संदर्भात त्यांनी संवैधानिक मार्गाने कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊन संबंधित प्रकरणाची सत्यता सिद्ध करावी. या प्रकरणात विनाकारण माझे नाव घेऊन मला विविध प्रकारचे धमकीचे फोन देखील येत आहेत. या मिळालेल्या धमकीत मला आपण हेमंत पाटील प्रकरणात हस्तक्षेप न करता काढता पाय घ्यावा. अन्यथा मला तुमचा बंदोबस्त करावा लागेल. अशा आशयाची धमकी मिळाली असल्याचे सारांश भावसार यांनी सांगितले. पोलीस दलातील कर्मचारी व हेमंत पाटील यांचा प्रशासकीय हस्तक श्रीकांत पाटील यांनी काही सराईत गुन्हेगारांना हाताशी घेऊन मला गंभीर अशी शारीरिक इजा पोहचविण्याचा हेतूने व समाजकारणात तथा राजकारणातुन बेदखल करण्यासाठी ५० लाखाची सुपारी देखील दिल्याचे मला खासगी माहितीद्वारे निदर्शनास आले असल्याचे भावसार म्हणाले. धुळे जिल्ह्यात काही वर्षांपासून मोजके तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांमार्फत गणवेशातील असलेली दरोडेखोरी माझ्या माध्यमातून बंद होताना दिसत असल्यामुळे माझ्यावर असे बेछूट आरोप लावण्यात येत असल्याचे भावसार म्हणाले. गिरधारीलाल रामरख्या यांच्यासारखे पोलिसांच्या आर्थिक शोषणाला बळी पडलेले अनेक जणांनी मला संपर्क साधून माहिती दिलेली असल्याचा दावा करीत लवकरच एक एक प्रकरण मी उघड करून संबंधितांना न्याय मिळवून देणार असल्याचे भावसार यांनी नमूद केले.

Social Plugin