रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुलाजवळ बांधकाम ठेकेदाराची चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या तिघा आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५१(२)(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. चिनावल) यांना मजूर मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपी शेख मुस्तकीम याने अजंदा येथे बोलावले. रेल्वे पुलाजवळ शेतात नेऊन चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील ५०० रुपये लुटले. त्यानंतर मोबाईल हिसकावून फोन-पेचा पिन जबरदस्तीने विचारून त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ८ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वळवले आणि आरोपी फरार झाले.
गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. रात्रीची वेळ असल्याने आरोपींची ओळख स्पष्ट होत नव्हती. मात्र, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डिबी पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
या कारवाईत शेख मुस्तकीम शेख अकील (२२, रा. फतेहनगर, रावेर), शेख मोईन शेख नईम (१९, रा. खिर्डी रोड, विवरा) आणि फैजल बेग हितायत बेग (१९, रा. शंकर प्लॉट, रावेर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एमएच-१९-ईडी-५५८० क्रमांकाची मोटारसायकल तसेच मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शेख मोईन याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या लुटीचा गुन्हा दाखल असून, या टोळीने आणखी काही लुटीचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील व गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Social Plugin