खळबळजनक- रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून तरुणास लुटले.

 




शहरासह जिल्ह्यात चोरी व लुटमारीच्या घटनामध्ये वाढ झाली असून आता रिक्षातून प्रवास करणे देखील धोकेदायक ठरू लागले आहे. रेल्वे स्थानक येथील रिक्षा चालकाने एका तरुणाला निर्जन स्थळी नेत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील साईनगर परिसरातील रहिवासी असलेल्या जितेंद्र राम किशन मोर्या (वय २२) हा तरुण दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावरून एका अनोळखी रिक्षात बसत घरी जाण्यासाठी निघाला असता,  त्याला अनोळखी रिक्षा चालकाने रस्ता बदलवीत या ठिकाणी न नेता मेहरूण तलावाच्या जंगलात लूट करण्याच्या हेतूने नेले व याठिकाणी रिक्षा चालकाने तरुणाला तू जर पोलिसांना तक्रार करशील तर तुला जिवंत ठेवणार नाही. असा धाक दाखवला यावेळी मागे बसलेल्या तरुणांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातून १५ हजार किमतीचा ओपोचा मोबाईल व १ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी जितेंद्र मोर्या यांच्या दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास अतुल वंजारी करत आहेत.