भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण हायकोर्टाने एकनाथ खडसे यांची याचिका फेटाळली- अटकेची टांगती तलवार.

 



भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर एसीबीने दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे दिसून आले आहे.



एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर याच प्रकरणात ईडीने देखील गुन्हा दाखल केला असून यात खडसे दाम्पत्य हे जामीनावर आहेत. तर त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे याच प्रकरणात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरूंगात होते. अलीकडेच त्यांना जामीन मिळालेला आहे.


दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी आ. एकनाथराव खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला. यात कोर्टाने आमदार खडसे यांची याचिका निकाली काढली. अर्थात, हा गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.


उच्च न्यायालयाने याचिका दाखल केल्यानंतर आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात अटकेसारखी कार्यवाही करू नये असे निर्देश दिले होते. यामुळे त्यांना एक प्रकारे संरक्षण मिळालेले होते. तथापि, आज न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने हे संरक्षण देखील आपोआप रद्द झालेले आहे. यामुळे आगामी काळात त्यांना मोठ्या अडचणींना सामारे जावे लागण्याची शक्यता आहे. यात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचेही दिसून येत आहे.