जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारातील एका शेतात रखवालदारी करणार्या ५५ वर्षीय सालदाराचा अज्ञात चोरट्यांनी खून करून शेतातील ट्रॅक्टर व रोटाव्हेटर पळून नेल्याची धक्कादायक घटना आज घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा शिवारात शेत असून येथे बिलवाडी येथील रहिवासी पांडुरंग पंडित पाटील ( वय ५२) हे सालदार म्हणून काम करत होते. ते शेतात रखवालदार म्हणून काम करत असल्याने रात्री शेतातच राहत होते. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी या शेतात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. याप्रसंगी चोरट्यांनी अवजड वस्तूने त्यांच्या डोक्यात वार केल्याने पांडुरंग पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चोरटे ट्रॅक्टर व रोटाव्हेटर घेऊन पळून गेले.
दरम्यान, आज सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकाचे निरिक्षक जयपाल हिरे हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Social Plugin