महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे बेरोजगार झालेल्या भाजीपाला, फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. सणासुदीच्या दिवसात त्यांच्या तोंडाचा घास हिसकावण्याऐवजी व्यवस्था करावी अशी मागणी करीत शिवसेना उबाठाच्या वतीने मनपा आयुक्त सौ.अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. आग्रा रोड वर देवपूर सह शहरात राबविल्या जात असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे स्वागत शिवसेनेने केले आहे. यामुळे नागरिकांना होणारा त्रास , रस्त्यावरील अपघात यांना आळा बसेल, मात्र टक्केवारीने पैसे काढून भाजीपाला व फळमाल भरून विकणाऱ्या विक्रेत्यांचे व त्यांच्या कुटुंबांचे एकदम व्यवसाय बंद पडल्यामुळे हाल झाले आहेत.त्यांना पर्यायी जागा नसल्याने ते पुन्हा सात ते आठ दिवसांत त्यांचं जागेवर अतिक्रमण करून मनपाची उत्कृष्ठ मोहीम निष्क्रिय करतील तेव्हा महापालिकेने प्रत्येक प्रभाग निहाय मनपाच्या मालकीच्या जागेवर भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी जेणे करून धुळे शहर स्वच्छ सुंदर बनविण्यास मदत होईल. विस्थापितांना नवरंग पाण्याची टाकी किंवा एकविरा देवी समोरील नदीकाठच्या रस्त्यावर जागा देण्यात यावी असा पर्याय शिवसेनेने सुचविला आहे यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख डॉ.सुशील महाजन,धीरज पाटील,ललित माळी, भरत मोरे,दिनेश पाटील, आदी विक्रेते व महिला उपस्थित होते.

Social Plugin