रेकॉर्डवरील गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळ्यातून पकडली आहे. टोळीतील तिघांकडून सुमारे साडेतीन लाखांच्या चोरीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच तपासात या संशयीत चोरट्यांनी घरफोडीचा गुन्हाही कबूल केला आहे. त्यांच्याकडून घरफोडीतील ऐवज ही जप्त केला आहे. धुळे शहरातील गुरुद्वारा जवळील पुलाच्या खाली फैजान मुंजबिल अन्सारी आणि त्यांचे दोन साथीदार उभे असून त्यांचा दुचाकी चोरी आणि घरफोडीत हात असल्याची खात्रीलायक माहिती गुप्त बातमीदार मार्फत एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.या माहितीच्या आधारे पीआय शिंदे यांनी एलसीबीच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. एलसीबीचे पथक गुरुद्वारात पुलाखाली पोहचले तेथे त्यांनी फैजान अन्सारी राहणार कबिरगंज हाजीनगर वडजाई रोड धुळे, रहेमान फरीदखान पठाण राहणार अंबिका नगर यांच्या सह तिघांना पकडले . या तिघांनी चोरी केलेल्या दुचाकी फैजानच्या घराच्या ओडोशाला लावून ठेवल्याचे कबूल केले. एलसीबीच्या पथकाने तीन लाख ४१ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांना आणखी बोलते केले असता घरफोडीची ही कबुली त्यांनी दिली .या तिघांनी मिळून संत नरहरी कॉलनी,अंबिका नगर, येथील बंद घरातून चोरी केल्याचे सांगितले.या घरातून या तिघांनी ६ हजार रुपये किंमतीची चांदी धातूची १८ भार वजनाची पट्टी आणि ५ हजाराची रोकड चोरली होती. घरफोडीतील मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे . या तिघांवर दुचाकी चोरी आणि घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.रहेमान पठाण विरूध्द मोहाडी पोलिसांत दोन गुन्ह्यांची यापूर्वीच नोंद आहे.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे , पीएसआय अमरजीत मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी,प्रकाश पाटील, एएसआय शाम निकम,संजय पाटील,हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील,संतोष हिरे,सुरेश भालेराव, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील,योगेश साळवे, हर्षल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Social Plugin