ग्रामगौरव प्रकाशनाच्या राज्य संपादकपदी 'गावगाडा'चे दिनेशजी दीक्षित यांची नियुक्ती

 


पुणे- ग्रामीण विकासाला सकारात्मक मांडून प्रेरक लोक,संस्था आणि पंचायतराज व्यवस्थेमधील अधिकारी यांच्या अनेक घटकांना "प्रतिबिंब महाराष्ट्राचं,ग्रामीण विकासाचं!" या ब्रीद वाक्यानुसार राज्यभरात पोहचण्याच्या उद्देशाने पुण्यातून कार्यरत ग्रामगौरव मासिक प्रकाशनाच्या "राज्य संपादक" पदी ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सकाळ मधून त्याकाळी गावागाडा या तुफान लोकप्रिय ठरलेल्या सदराचे लेखक  पत्रकार श्री.दिनेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामगौरवच्या मुख्य संपादिका कु.धनश्री ठाकरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.


जळगाव जिल्ह्यातून आपली पत्रकारिता करणारे, अगदी शांत,कामाशी काम आणि गावखेड्याच्या  विषयात रुची असणारे श्री.दीक्षित हे दैनिक जनशक्ती, गावकरी,तरुण भारत,सकाळ अशा वेगवेगळ्या दैनिकात सुमारे वीस वर्ष कार्यरत होते. ते सद्या एका नामांकित राष्ट्रीय उद्योगासाठी कंटेन्ट रायटर म्हणून सुद्धा आऊटसोर्स काम करीत आहेत.


सातपुडा बचाव रॅलीचे संयोजक,जळगाव आकाशवाणीत दहा वर्ष कॅज्युअल अनाउन्सर, एम.जे.कॉलेजमध्ये जर्नालिझमचे दहा वर्ष प्राध्यापक,जैन इरिगेशनच्या नामांकित भूमिपुत्र मासिकाचे कार्यकारी संपादक असा पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

दैनिक सकाळमध्ये असतांना खांदेशातील सुमारे सव्वाशे गावांच्या वैशिष्ट्य सांगणारे 'गावगाडा', वेगवेगळ्या दीडशे जणांच्या प्रेरक 'वेगळ्या वाटा' आणि 'यशस्वी महिलांची कथा' अशी सदरे त्यांच्या आगळ्या वेगळ्या पत्रकारितेची ओळख देतात.


श्री.दीक्षित यांच्याकडे ग्रामगौरव मासिकाच्या राज्य संपादक पदाची सूत्रे देतांना प्रकाशनाचे समूह संपादक श्री. विवेक ठाकरे यांनी मासिकाची राज्यभर सुरु असलेली वाटचाल अधिक दर्जेदार आणि लोकोपयोगी राहील,अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.