खान्देश नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास.

 


संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विशाल खान्देशचे नेते म्हणून ठसा उमटविणारे आणि अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते. माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र आणि संपूर्ण खान्देशावर शोककळा पसरली आहे . त्यांच्यावर शनिवारी दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता धुळे शहरातील देवपूर येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 




याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात प्रदीर्घकाळ मंत्री म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळलेले माजी मंत्री तथा खान्देश नेते दाजीसाहेब रोहिदास  चुडामण पाटील यांचे आज शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी  ११ वा. धुळ्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांच्याजवळ त्यांच्या धर्मपत्नी सौ. लताताई रोहिदास पाटील, ज्येष्ठ सपुत्र श्री विनय रोहिदास पाटील, आ. कुणाल रोहिदास पाटील , जावाई  डॉ. चंद्रशेखर पाटील ,मुलगी सौ. स्मिता चंद्रशेखर पाटील , स्नुषा सौ ऋची विनय पाटील, सौ. अश्विनी कुणाल पाटील, यांच्यासह त्यांचे नातवंडे व आप्तेष्ट, निकटवर्तीय उपस्थित होते. निधनाचे वृत्त वाऱ्यासारखी  जिल्ह्यात सर्वदूर पसरली आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तालुकाभरातून ओघ त्यांच्या दर्शनासाठी निवासस्थानाकडे सुरू झाला.

माजी मंत्री स्व. रोहिदास चुडामण पाटील यांचे पार्थिव दर्शन नेहरू हौसिंग सोसायटी , देवपूर धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात उद्या शनिवारी दी.२८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत घेता येणार आहे.  त्याची अंत्ययात्रा उद्या शनिवारी दी. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी , देवपूर धुळे येथील त्यांच्या राहत्या घरापासून  निघणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर एसएसव्हीपीएस कॉलेज देवपूर धुळेच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.