धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी मविआ कडून एकनिष्ठ शिवसैनिकच निवडणूक लढवणार, डॉ. सुशील महाजनांकडून वचननामा जाहीर!





धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढविण्यास मी इच्छुक आहे. निवडणुकीसाठी माझी तयारी पूर्ण झाली आहे. कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. फक्त मातोश्रीवरून आदेशाची वाट पाहत असल्याचे सांगत शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन यांनी धुळे विधानसभेसाठी आपला वचननामाच जाहीर केला आहे. शिवसेनेकडून धुळे शहरासाठी कोणताही उमेदवार निश्चित झाला नसून जनतेने कोणत्याही अफवांवर अथवा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहनही डॉ. महाजन यांनी केले. विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून एकनिष्ठ शिवसैनिकच लढणार. कोणताही उमेदवार आयात केला जाणार नाही असा विश्वासही डॉ. महाजन यांनी व्यक्त केला.

महानगरप्रमुख डॉ.सुशील महाजन यांनी देवपुरातील त्यांच्या शिवालय  या कार्यालयात  पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत डॉ.महाजन  म्हणाले की , गेली दोन दशके  धुळे शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना या शहरासोबतच संबंध जिल्ह्यातील नागरिकांशी माझे ऋणानुबंध तयार झाले आहे. यातून मला माझा जिल्हा , माझं शहर आणि माझी माणसं कळत गेली .धुळे शहर एकेकाळी महाराष्ट्रातील एक प्रमुख  शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र होत पण जागतिकीकरणाच्या रेट्यात तयार झालेल्या स्पर्धेत धुळे शहर मागे पडल. शहरासह  जिल्ह्यात असलेले उद्योग बंद पडले.  शैक्षणिक संस्थांचा दर्जा खालवला , आणि धुळे शहर व जिल्ह्याच्या माथी मागासलेपणाचा टिळा लागला.ही परिस्थिती बदलणे हा माझा मुख्य सामाजिक व राजकीय हेतू आहे मोठ्या प्रमाणावर मानवी संसाधन उपलब्ध असलेल्या या शहरात जास्तीत जास्त उद्योग आणि व्यवसाय आणून इथल्या अर्थचक्राला पुनरूर्जीवित करणे हा माझा मानस आहे . एका अर्थसंपन्न शहराची खरी उंची त्या शहराची सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संपन्नतेवर ठरवली जाते. म्हणून या राजकीय कार्यातून धुळे शहराचा शाश्वत विकास घडवून हे शहर प्रगतीपथावर आणणे, हे माझे व्हिजन आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाच्या मतांच्या बळावर धुळे शहराच्या पुढील पन्नास वर्षाच्या सर्वागीण विकासाचा लढा उभा करायचा आहे.रायझिंग धुळे अर्थात उभरत या मोहिमेच्या माध्यमातून मी प्रत्येक धुळेकरांच्या स्वप्नातील धुळे शहर जाणून घेण्याच्या प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य धुळेकरांच्या कल्पना संकल्पना आणि व्यवहार्यतेच्या सुवर्ण माध्यमातून आपल्याला उद्याचं धुळे शहर घडवायचं आहे. धुळे शहरातील गुंडगिरी, टक्केवारी नष्ट करण्याचा प्रयत्न माझा संकल्प आहे .मी धुळे शहराच्या कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत डॉ.सुशील महाजन यांनी वचननामाच सादर केला.

या वचननाम्यात महिला सशक्तीकरणासाठी लघुउद्योग   उभारणार, स्वच्छ धुळे सुंदर धुळे हरित धुळे बनवणार तरुणाईच्या विकासाचे राजकारण गतिमान करणार , भाऊसाहेब हिरे रुग्णालयात अद्ययावत करून एम आर आय ऑपरेशन थिएटर उभारणार , धुळे शहरात ऑक्सिजन पार्कची निमिर्ती करणार, विद्यार्थ्यांसाठी अद्यावत  अभ्यासिका सुरू करणार , दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉरसाठी प्रयत्नशील राहणार,धुळे शहरात कृषी विद्यापीठ उभारण्यावर जोर देणार , शहरातील होकर्ससाठी प्रभगनिहाय बाजारपेठ तयार करून शहरातील रस्ते मोकळे  करणार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नूतनीकरण करणार , शहरातील ऐतिहासिक वास्तू  व मंदिर जोपासणार, पांझरा नदीच्या काठाला आकर्षक गार्डन व बोटिंगची व्यवस्था करणार, धुळे शहराचे बसस्थानक आधुनिक करणे व शहरातील बससेवा सुरु करणे, बसथांबे सुशोभित करणे , धुळे शहरातील विद्युत तारा भूमिगत करणे, व हरित धुळे संकल्पना राबविणे ,धुळे महानगरपालिकेकरिता अद्यायावत वाहने व उपकरणे , खरेदी करून धुळे शहर  स्वच्छ ठेवणे ,धुळे विमानतळाचे आधुनिकीकरण करून कमीत कमी एक दिवसाआड मुंबई गोवा उड्डाण सुरू करणे, एज्युकेशन हब तयार करणे, धुळे शहरासाठी सर्व सोयीयुक्त असे उद्यान उभारणे , धुळे शहरात मोठे मॉल व फूड हब तयार करणे , धुळे शहरासाठी स्वतंत्र सोलर एनर्जी प्लांट तयार करण्याचा मानस ,कृषी उत्पन्न बाजार समिती विकास करणे इनडोअर स्टेडियम व जलतरण तलाव, निर्मिती धुळ्यातील मल्ल पैलवान यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्लविद्या संकुलाची निर्मिती करणे या मुद्द्यांचा समावेश आहे . मागील विधानसभा निवडणूक  २०१९ ला मी इच्छुक होतो. त्यावेळेसही आमचे जिल्हाप्रमुख हिलाल अण्णा माळी यांना आदेश दिल्यामुळे पाच वर्षे पुन्हा एकनिष्ठपणे शिवसेनेचे काम केले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून  धुळे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा व कार्य उंचावत ठेवला ,वेळोवेळी  पक्ष व पक्षातले शिवसैनिक यांच्या अडीअडचणींना धावून गेल्यामुळे आज सर्व शिवसैनिक व पदाधिकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.