आमची मते कुठे गेली? धुळेकरांचा संतप्त सवाल निवडणूक आयोगाविरुध्द महाविकास आघाडी विशाल 'मशाल' मोर्चा काढणार

 




धुळे विधानसभेचा निकाल लागून अवघा आठवडा लोटला तरी धुळेकर निकालाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही. गेल्या ६ महिन्यांपासून विविध पक्ष, वृत्तवाहिन्या, निवडणुकांच्या सर्व्हे करण्याच्या कंपन्यामार्फत धुळे विधानसभा मतदार संघाचा सर्व्हे भाजप पक्षाच्या भुवया उंचावणारा होता. या पक्षाचे इच्छुक उमेदवार अनुप अग्रवाल यांनी उमेदवारीचे बाशिंग बांधले होते. परंतु त्यांचा सर्व्हे कितीही काथ्याकुट केला तरी ५- ६% च्या वर जात नव्हता. अनिल गोटेंना मात्र ५०-५१% लोकांनी पसंती दिली ती कायम निवडणूक होईपर्यंत कायम राहिली. त्यांच्या खालोखाल माजी आमदार फारुख शहा यांचा सर्व्हे २८-३०% च्या घरात होता.


ग्राऊंड रिपोर्ट तर भयंकरच होता. गल्ली-गल्लीत, चौका-चौकात, मोलमजुरी करणारा, नोकरदार, व्यापारी, रिक्षावाले भाजी-फळ विक्रेते किंबहुना सर्व हॉकर्स, हमाल-मापाडी, टपरी धारक... अगदी सर्वच वर्गातील लोक कुणालाही विचारा? धुळ्यात कोण निवडूण येईल ? १० पैकी ८ लोक अनिल अण्णांचे नाव घ्यायचे ही वस्तुस्थिती होय. एवढेच कशाला पोलीस व प्रशासनाचा रिपोर्ट देखील अनिल अण्णांच्याच नावावर मोहर उमटवून मोकळे झाले होते.


या निवडणूकीत तर अनिल अण्णांच्या सोबत शिवसेना (उबाठा) होतीच, परंतु अण्णांचे यच्चयावत विरोधक त्यांच्या सोबत होते. २५-३० वर्ष राजकीय वैर असलेले लोक, अबोला धरलेले लोक, पदरमोड करून राबत होते. एवढेच नाही प्रतिस्पर्ध्याच्या गोटातील तालेवार, जनाधार असलेले नेते देखील आतुन अण्णांचे काम करत होते. मराठा समाजात भाजपा सरकार विरुध्द प्रचंड राग होता नि आहे, आरक्षणाच्या मुद्यावरुन ! मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी तर पाडा म्हणून आदेश सोडले होते. धुळ्यातील मराठा समाज खुप मोठ्या संख्येने अण्णांच्या पाठीशी होता. माजी आमदार फारुख शहा यांच्या कार्यपध्दतीवर नाराज मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात अण्णांच्या पाठीशी होता. गेल्या ३० वर्षांपासून अण्णांवर कायम विश्वास ठेवणारा, मते देणारा... अण्णांची हक्काची मते ३० हजारांवर आहेत. शिवसेनेची २० ते २५ हजार काँक्रीट मते कधीच फुटली नाहीत हे प्रत्येक निवडणूकीने दाखवून दिले आहे. हे पन्नास हजार मते अधिक वरील बेरजेची समीकरणे एकत्र केली तर आकडा कुठे जातो? आणि अण्णांना मते किती मिळाली... २४ हजार ? शक्यच नाही. अनाकलनीय !


शेकडो कार्यकर्ते, मतदार रोज आण्णांना भेटून विचारताहेत, आमची मते गेली कुठे ? २५- ३० हजाराचा टप्पा पार करु शकणार नाही... बॅलेटवर निवडणूका घेतल्या तर ! मात्र EVM ने त्याला धुळेकरांवर लादला. हा मतदारांचा घोर अपमान आणि चेष्टा होय.


हे आक्रीत अवघ्या महाराष्ट्रात घडले. या सर्व मशीनी गुजरातमधून आणल्या गेल्या. महाराष्ट्रात ८७००० बुध आहेत. तेवढ्याच मशीनी नि तेवढीच माणसे गुजरात मधून आले नि काम दाखवून गेले. EVM बनविणाऱ्या कंपनीमध्ये भाजपने देखील गुजराती डायरेक्टर नेमले ते मशीनचे सिक्रेट लिक करण्यासाठीच! हे समजून घेतले पाहिजे. ते कमी होते की काय ? निवडणूक आयोगाच्या कृपेने महाराष्ट्रात तब्बल ७६ लाख मते मतदान झाल्याच्या नंतर २४ तासांनी वाढविली गेली. ती कुणाच्या पारड्यात गेली, हे शेंबडे पोर देखील सांगू शकतो. २० नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजेपर्यंत ५८% मतदान झाल्याचे सांगण्यात येते. मग त्याच रात्री ११.३० वाजता हेच मतदान ६५% पर्यंत वाढते नि दुसऱ्या दिवशी अंतीम वाढ ६६% पर्यंत म्हणून एकूण ७.८३ टक्क्यांनी वाढ दर्शवते. म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदार संघात २६५०० मते जास्तीची घालण्यात आली. त्याचे कुठलेही रेकॉर्ड नाही. स्पष्टीकरण नाही.


गेल्या ७० वर्षांत अशी मतदान वाढ कधी ऐकली नाही. मात्र मागील लोकसभा नि या निवडणूकीत हा मतांचा भ्रष्टाचार निवडणूक आयोग अगदी निर्लज्ज होवून करत आहे, हे लोकशाही संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. निवडणुका स्वच्छ, मोकळ्या व पारदर्शीपणे पार पाडण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.


महाराष्ट्राच्या निवडणूकीत ७६ मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा कमी मते मोजली गेली तर १९ मतदार संघात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते मोजली गेली. हे मुळीच पारदर्शी नाही. हा भ्रष्टाचार आहे. मतदारांच्या मतांवर दरोडा आहे. जनतेचा प्रतिनिधी निवडणूक आयोग ठरवित आहे.


हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहाता नि सहन करता कामा नये. आमची मतदार बंधु- भगिनींना सविनय नम्र विनंती आहे. आपण अण्णांना मतदान केले आहे. आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आपणास घटनेने दिला आहे. परंतु EVM आपली मते इतरत्र वळवत असेल तर त्याचा निषेध करणे, विरोध करणे, पेटून उठणे ही लोकशाहीची गरज आहे. आपण जरआज या अन्यायाविरुध्द आवाज उठवला नाही, तर देशात अराजक माजेल नव्हे, त्याची सुरुवात झालीच आहे.


महाराष्ट्रातून EVM बंदची हाक आपण धुळ्यातून मारत आहोत... या ठिणगीचा वणवा पेटावा... EVM नको बॅलेट हवे. ही आपली मागणी आहे. खरे तर ही निवडणूक अण्णांसाठी जनतेने हातात घेतली होती. जी मते भाजपा उमेदवारास पडली, ती आपली वळवलेली मते होय. आपल्या चोरलेल्या मतांसाठी आपण दाद नाही का मागणार? ही लोकचळवळ झाली पाहजे... हे आंदोलन जनतेने हाती घेतले पाहिजे... निर्भीड होवून, कुणाच्या दबावाला भीक न घालता. या मोर्चात जेवढ्या प्रचंड संख्येने सामील व्हाल, तेवढ्याच प्रचंड वेगाने हे जनआंदोलन महाराष्ट्र हलविल्याशिवाय राहणार नाही. तूर्त इतकेच असे संयुक्त पत्रक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. अतुलभाऊ सोनवणे, श्री. भगवान बापूजी करनकाळ, श्री. नरेंद्र परदेशी, श्री. धिरज पाटील, श्री. अविनाश लोकरे यांनी काढले आहे.