प्रलंबित देयके मिळण्यासाठी कंत्राटदारांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने


प्रलंबित देयके तातडीने मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी शुक्रवार दिनांक ४ जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने केली.धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने हे संयुक्त आंदोलन करण्यात आलं. तसेच दोन्ही संघटनांतर्फे प्रशासनाला निवेदने देण्यात आली. यापूर्वीही प्रलंबित देयके मिळण्यासाठी कंत्राटदारांतर्फे अनेकदा आंदोलने करून प्रशासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग ४० हजार कोटी , जलजीवन मिशन अंतर्गत च्या कामांचे १२ हजार कोटी ,ग्रामविकास विभाग सहा हजार कोटी, जलसंधारण व जलसंपदा विभाग १३ हजार कोटी, नगर विकास अंतर्गत विशेष निधी , डीपीडीसी फंड, ग्रामीण सुधारणा विभाग कामे १८ हजार कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटदाराची बिले शासनाकडे अडकले आहेत. ही बिले त्वरित मिळावीत.यासाठी कंत्राटदारांनी निदर्शन करताना जोरदार घोषणाबाजी केली.

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन तर्फे विलास माळी  तर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन तर्फे प्रकाश पांडव यांनी माध्यम प्रतिनिधी समोर आपली भूमिका मांडली.आंदोलनात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष  संदीप महाले, कार्याध्यक्ष दीपक भामरे, खजिनदार पुरुषोत्तम कोतकर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर, उपाध्यक्ष नितीन अग्रवाल,सचिव अनिल पवार यांच्यासह पदाधिकारी आणि सभासद कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते.