जळगाव (दि. 15 सप्टेंबर) – जळगाव शहरातील महाबळ व आदर्श नगर परिसरात बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या दोन महिलांना रामानंद पोलीसांनी अटक केली आहे. या महिलांकडून अंदाजे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठेकेदार किरण जगन्नाथ पवार यांनी बांधकाम सुरू असलेल्या साईटवरून दिनांक 10 जून ते 4 जुलै 2025 या कालावधीत सेंट्रिंगच्या प्लेटा, लोखंडी जॅक व लोखंडी शिंकज्या असा एकूण 90 हजार रुपयांचा साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा रजि. क्रमांक 279/2025, बीएनएस कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ना. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्हे शोधपथकाने तांबापूर परिसरातील दोन महिलांचा शोध घेतला. त्यात संशयित संगीताबाई प्रभाकर चौधरी व हीराबाई दिलीप चव्हाण (दोन्ही रा. तांबापुर, जळगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
दोन्ही महिलांना 15 सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयीन आदेशानुसार 18 सप्टेंबरपर्यंत 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळविण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 20 सेंट्रिंग प्लेटा (किंमत 40 हजार रुपये) हस्तगत करण्यात आल्या.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोउपनि सचिन रणशेवरे, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, सुशील चौधरी, जितेंद्र राठोड, विनोद सुर्यवंशी, योगेश बारी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, गोविंदा पाटील व अतुल चौधरी यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोना विनोद सुर्यवंशी हे करीत आहेत.

Social Plugin