जळगावात मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश; २ दुचाकी जप्त.




जळगाव शहरातील नवीन बसस्टॅन्ड परिसरातून मोटारसायकल चोरीच्या घटनेचा जिल्हापेठ पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

नवीन बसस्टॅन्ड येथून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे CCTNS No. 43/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3(5) प्रमाणे 26 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आरोपींचा माग काढत मालेगाव येथील

मलीक अल्ताफ अहमद अन्सारी

मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक

अबुबकर नईम कौसर

यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी जळगावातील नवीन बसस्टॅन्ड येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (MH19 BS 1573) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली.

तसेच पुढील चौकशीत आरोपी TVS कंपनीची रायडर (MH15 JF 3609) मोटारसायकल घेऊन नाशिकहून जळगावला आले होते. त्यांनी ही मोटारसायकल साक्षीदाराला विक्रीच्या बहाण्याने दिली व कागदपत्रे नंतर देतो असे सांगून त्याच वाहनावर बसस्टॅन्ड येथे पोहोचून दुसरी मोटारसायकल चोरी करून मालेगावला पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सदर तिघा आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.