जळगाव (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर महाबळ चौक येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर भीम सैनिक आकाश सुरवाडे यांच्या पुढाकाराने १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मसाला ताक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना थंडावा मिळावा तसेच सामाजिक एकोपा आणि सेवाभाव वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने मसाला ताक वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन सोनवणे व योगेश सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व समाजबांधवांनी महाबळ चौक येथे येऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच जयंती उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आकाश सुरवाडे यांनी केले आहे.

Social Plugin