बोईसर रेल्वे स्थानकावर सापडलेला ८ वर्षीय मुलगा आईच्या संपर्कात; पालघर जीआरपीची तत्परता

 



बोईसर (प्रतिनिधी): बोईसर रेल्वे स्थानकावर हरवलेल्या अवस्थेत सापडलेल्या आठ वर्षीय मुलाला पालघर रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याच्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधण्यात यश आले आहे.

३० जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता बोईसर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर गस्त घालत असताना पालघर जीआरपी व होमगार्ड यांना एक मुलगा विनापालक फिरताना आढळला. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव टीलू मन्या पवार (वय ८ वर्षे) असून तो दोंडाईचा, जि. नंदुरबार येथील असल्याचे सांगितले.

यानंतर पालघर रेल्वे पोलिसांनी गुगलच्या माध्यमातून दोंडाईचा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तसेच मित्रपरिवाराच्या मदतीने मुलाच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधण्यात आला. मुलगा सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर त्याची आई तातडीने पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात येत असल्याचे सांगितले.

पालघर जीआरपी आणि होमगार्ड यांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि समन्वयामुळे हरवलेल्या चिमुकल्याला त्याच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यात यश आले. या कार्याबद्दल पालघर रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.