जळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे व महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ डोस पाजून अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी बाळ आणि बाळंत मातांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. महापौर दीपमाला काळे यांनी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे आवाहन करत, ३० जूनपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे, इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Social Plugin