जळगाव | प्रतिनिधी
नंदिनीबाई गर्ल्स स्कूल येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. दि. २२ जुलै रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत झालेल्या या सत्रात सुमारे २५० विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या सत्रात प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2FA), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे तसेच मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. तसेच सुरक्षित डिजिटल जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला नंदिनीबाई गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एम. राणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Social Plugin