जळगाव : 2020 मध्ये गाजलेल्या जळगाव उपकारागृहातून कैदी पळून जाण्याच्या प्रकरणात अखेर सत्र न्यायालयाने मोठा निकाल देत बहुचर्चित प्रकरणातील 9 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. मोरवाले यांच्या न्यायालयाने 16 मार्च 2026 रोजी हा निकाल दिला.
या प्रकरणात सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील, सुशील अशोक मगरे, जगदीश पुंडलिक पाटील, नागेश मुकुंदा पिंगळे, अमित उर्फ निलेश सुधर्शन चौधरी उर्फ बिहारी, सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील, चेतन उर्फ माया अनिल भालेराव आणि करण रतीलाल पावरा यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. तर राहुल उर्फ आनंद सोनवणे (पाटील) आणि दिगंबर बालू कोळी हे आरोपी अद्याप फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रकरणानुसार, 25 जुलै 2020 रोजी सकाळी जळगाव उपकारागृहातील सुरक्षा रक्षक पंडित गुंडाळे यांना पिस्तूलाचा धाक दाखवून मुख्य गेटची किल्ली हिसकावण्यात आली आणि आरोपी सागर पाटील, गौरव पाटील व निलंबित पोलीस सुशील मगरे हे कैदी जेलमधून पळून गेले, असा आरोप होता. तसेच इतर आरोपींनी पिस्तूल, सिमकार्ड आणि वाहनांची व्यवस्था करून या घटनेत मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने सरकार पक्षाचे पुरावे अपुरे असल्याचे स्पष्ट केले. मुख्य साक्षीदार पंडित गुंडाळे यांच्या साक्षीत अनेक विसंगती आढळल्या असून त्यांच्या साक्षीस आवश्यक ते ठोस पुरावे मिळाले नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. जेलमधील मुख्य गेटवरील CCTV फुटेज सादर करण्यात आले नाही, तसेच इतर कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसल्याचेही न्यायालयाने निदर्शनास आणले.
तसेच, जप्त करण्यात आलेले पिस्तूल, वाहन व मोबाईल यांचा आरोपींशी थेट संबंध सिद्ध करणारा ठोस पुरावा सादर करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने म्हटले. कथित कट सिद्ध करण्यासाठी कोणतेही कॉल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे किंवा विश्वसनीय साक्ष उपलब्ध नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
इलेक्ट्रॉनिक पुरावे (CCTV व पेनड्राइव्ह) बाबतही योग्य प्रक्रिया न पाळल्याने ते विश्वासार्ह ठरत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, अनेक जप्ती पंचनामे हे उघड्या व कोणाच्याही ताब्यात नसलेल्या जागांवरून करण्यात आल्याने त्यांची विश्वासार्हता कमी असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या सर्व बाबींचा विचार करता, “संशय कितीही मजबूत असला तरी तो पुराव्याची जागा घेऊ शकत नाही” असे स्पष्ट करत न्यायालयाने सर्व आरोपींना IPC कलम 307, 353, 224, 225, 120B, 201 तसेच आर्म्स अॅक्ट कलम 3/25 मधून निर्दोष मुक्त केले.
न्यायालयाने आरोपींचे विद्यमान जामीन बाँड रद्द करून प्रत्येकी 25 हजार रुपयांचा नवीन बाँड भरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जप्त मालमत्तेबाबत स्वतंत्र आदेश देत काही वस्तू नष्ट करण्याचे, तर काही संबंधितांना परत करण्याचे निर्देश दिले. पिस्तूल जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, फरार आरोपी राहुल उर्फ आनंद सोनवणे आणि दिगंबर कोळी यांच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Social Plugin