देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळास भाडेतत्त्वावर देण्यात आलेली नऊ हेक्टर म्हणजे २२ एकर जमीन २०१५ ला क वर्ग करण्यात आली असून हे काम तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या संगनमताने झाले आहे. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी व दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा प्रथम महापौर भगवान करनकाळ यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
या निवेदनाचा आशय असा मौजे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ देवपूर या संस्थेला नऊ हेक्टर म्हणजे २२ एकर जागा भाडे तत्वावर देण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये नवीन शर्तीचा भंग झालेले २००२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जप्त करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षांनी नाशिक अप्पर आयुक्तांकडे रीतसर अपील दाखल केले.या अपिलाचा निकाल ३० डिसेंबर २००३ रोजी देण्यात आला आहे. या आपिलाच्या निकालातून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करून नगर आपिलार्थिंचा मुदत मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, तत्पूर्वी सदर मिळकत अपिलार्थी यांच्या नावावर करण्यात आल्याची खात्री करण्यात यावी या आदेशाची अध्यक्ष यांनी नाव लावण्याची खात्री करावी असे म्हटले आहे. या आदेशाचा गैरफायदा घेवून २००६ मध्ये तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी संगनमताने सरकार नाव नवीन शर्त नावे कमी केले. याचा अर्थ नवीन शर्त व सरकार नाव कमी केल्याने ही संपूर्ण जागा सातपुडा संस्थापक अध्यक्ष यांच्या नावे एक रुपयाही खर्च न करता करण्यात आली . सातपुडाला लागूनच असलेले भूखंड मात्र नवीन शर्तीचे आहेत.या भूखंड धारकांना हेच काम करण्यासाठी प्रती भूखंड पाच ते सहा लाख रुपये भरणा करावा लागतो आहे .नवीन शर्तीचे वर्ग करण्यासाठी शासनाला पट भरून घेण्यासाठी संबंधित भूखंड धारकांना महिनो महिने किंवा पायपीट करावी लागते. नजराणा पट भरल्या गेल्यानंतरही अन्य मार्गाने फी वसूल केली जाते. याबाबत आपण मुंबई येथे लोकआयुक्त , नाशिक विभागीय आयुक्त व धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत परंतु यांची दाखल घेतली जात नाही. संबंधित संस्थेत कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांनी भेटी देवून साधी चौकशीही केली नाही यामुळे या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा भगवान करनकाळ व मुन्नाभाई पठाण यांनी एका लेखी निवेदनातून दिला आहे.

Social Plugin