मौजे अंबापुर, ता. साक्री , जि.धुळे येथील गट नं.२८/१ मधील गायरान जमिनीवर अनधिकृत बांधलेल्या हॉटेल कृष्णा गार्डनवर अवैध बनावट दारू विक्री व्यवसाय व सदर हॉटेलवर अवैधरित्या लॉजिंग व्यवसाय देखील चालू असून संबंधित हॉटेल तात्काळ बंद करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मेंढपाळ ठेलारी विकास मंडळ संचलित, महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सदर हॉटेल कृष्णा गार्डन करत असलेल्या अवैध व्यवसायाबाबत वेळोवेळी निवेदन देऊन देखील सदर हॉटेल व्यवसायिक हा राजकीय दबाव तंत्र व पैशाच्या जोरांवर अवैध व्यवसाय सर्रासपणे चालवीत आहे. तसेच लोकांमध्ये जावून सांगत असतो की , माझ्याकडे पैसा आहे , माझे कोणीही काही करू शकत नाही , वास्तविक पाहता सदर व्यावसायिक हा सरकारी जागेवर अतिक्रमण करून महसूल खात्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. बनावट दारू विकून लोकांच्या आरोग्यास धोका पोहचवित आहे. आजपावेतो कुठलीही कार्यवाही न झाल्याने त्यांच्या मनात पोलीस व शासनाची कुठलीही भीती राहिलेली नाही.वास्तविक पाहता भारतात विविध राज्यात बनावट दारू पिऊन अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. अश्याच प्रकारे सदर हॉटेल व्यावसायिक हा बनावट दारू सर्रासपणे विक्री करत असून यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबधित हॉटेल कृष्णा गार्डन चालविणाऱ्या इसमावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी व सदरचे बेकायदेशीर हॉटेल बंद करण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर शिवदास वाघमोडे , पंकज मारनर , धनराज केसकर, रामदास कारंडे, गोविंदा रुपनर, दिनेश सरक ,विलास गरदरे, मोतीराम गरदरे, ज्ञानेश्वर सुळे, जानेश्वर सूळ, शालिक ठेलारी,बाबू कोटडकर , शिताशम आयकर , लक्ष्मण कुगर यांच्या सह्या आहेत.

Social Plugin