डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांचे आवाहन
दरवर्षी १६ मे रोजी "राष्ट्रीय डेंग्यू दिवस" साजरा करण्यामागचा इतिहास.
डेंग्यू दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतु म्हणजे लोकांना अजराबद्दल जागरूक करून,त्या आजाराची प्रमुख लक्षणे, कारणे व उपचाराबद्दल सखोलपणे माहिती अवगत करून देणे,या अजराबद्दल लोकांमध्ये जागरूकता असली तरी देखील लोकं या आजाराला मोठ्या प्रमाणात बळी पडतात, म्हणूनच लोकांमध्ये, डेंग्यू आजाराबाबत जागृती निर्माण व्हावी आणि त्याविषयी अचुक माहिती व्हावी यासाठी शासनस्तरावरून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
डेंग्यू ताप हा विषाणू मुळे होतो, डेंगुचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या संक्रमीत मादी डासाच्या मार्फत होतो. या डासांची उत्पत्ती ही मुख्यत्वे स्वच्छ आणि साठवुन ठेवलेल्या पाण्यात होत असते.कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा अधिक साठवून ठेवल्यास उघड्यावर असलेल्या त्या पाण्यात एडिस डासाची मादी अंडी घालते नंतर त्या अंड्याचे रूपांतर डासात होते.
म्हणुन नागरिकांना वारंवार आरोग्य कर्मचारी सूचना देत राहतात की कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नये, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असुन डासांची उत्पत्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्याची आवश्यकता आहे.लोकांमध्ये डेंग्यू आजाराविषयीची जनजागृती होण्याच्या अनुषंगाने, जळगांव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तथा उपजिल्हा रुग्णालयामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा दिनांक-१६ मे २०२४ गुरुवार रोजी साजरा होत आहे.
सण २०२४ या वर्षाचे घोषवाक्य "समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा" असे आहे.हा डेंग्यू दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की,नागरिकांमध्ये जागरूकता आणून डासांपासून होणाऱ्या डेंगू आजारास प्रतिबंध करणे.
प्रसार.
या एडिस डासांची उत्पत्ती स्वच्छ आणि आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठवून ठेवलेल्या पाण्यातच होत असते,उदा.सिमेंटच्या टाक्या,हौद,रांजण,प्लॅस्टिकच्या रिकाम्या बादल्या,नारळाच्या कारावंट्या,घरातील फुलझाडे असलेली कुंड्या,कुलर्सचे पाणी,फ्रिजचे भांड्याचे पाणी, गाडीचे खराब टायर्स, निरूपयोगी भंगार साहित्य, आदी मध्ये जास्त वेळ साठलेल्या पाण्यात एडिस डासांची मादी अंडी घालते, यातुनच मोठ्याप्रमाणात फैलाव होतो.लहान मुलं, गरोदर माता, वयस्कर लोकांची प्रतिकारशक्ती ही फ़ार कमी असल्याने त्यांना या आजाराची बाधा लवकर होते.
लक्षणे-
या डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो,
डोके,सांधे,स्नायू दुखीचा तीव्र त्रास सुरू होतो,
रुग्णास उलट्या होतात,डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे,अंगावर पुरळ येणे,नाक-तोंडातून रक्तस्त्राव सुरू होतो,
अशक्तपणा येणे,भूक मंदावणे,तोंडाला कोरड पडते, ही मुख्यत्वे लक्षणे प्रथमदर्शनी जाणवू लागल्यास, रूग्णाला लवकरात लवकर नजीकच्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे,उपजिल्हा रुग्णालय,सर्व शासकीय रुग्णालयात जाऊन, मोफत सर्व तपासण्या करून, वेळेत उपचार करणे गरजेचे आहे.
उपाययोजना-
भविष्यात डेंग्यू तापाच्या आजाराचा उद्रेक होऊ नये याकरिता नागरिकांनी काय काळजी घ्यावी याविषयी पुढील साधे व सरळ सोप्या प्रतिबंधात्मक उपायांची लोकांनी अमलबजावणी करावी.
साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत, कुलरचे पाणी बदलवत राहणे, फ्रिजच्या मागील पाणी फेकून द्यावे,
शक्यतो संध्याकाळच्या वेळी दार खिडक्या बंद करावेत, दार खिडक्यांना जाळी बसवावेत,
झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, डासांना पडवून लावण्यासाठी कॉइल लावणे,मच्छर अगरबत्ती लावणे, अंगाला मलम लावणे हे घरगुती तात्पुरते उपाय योजना कराव्यात.
आपल्या घराभोवताली अजिबात पाणी साचू देऊ नका, घरात साठवून ठेवलेले सर्व पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करून भांड्यातील पाणी उदा-रांजण, हौद, टाक्या आदी सर्वांची तळापासून स्वच्छ घासून कोरडे करून मगच वापरावेत व ते सर्व भांडी घट्ट
कापडाने बांधून ठेवावीत जेणे करून त्यात डासांची मादी अंडी घालायला जाणार नाही.
योग्य काळजी आणि वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या या डेंग्यू ताप आजारापासून दुर ठेवतो, त्याकरिता किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवणे करीता सर्व जनतेने सहकार्य करणे महत्वाचे आहे... असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांनी केले आहे.




Social Plugin