गेल्या १३ वर्षापासून पक्षासाठी निष्ठेने काम केले आणि करत आहे.शिवसेना आणि शिवसैनिकांची काळजी घेतली . पक्षाच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले.लोकसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लाऊन दिवसरात्र काम केले.मात्र त्यांचे असे फळ मिळेल असे वाटले नव्हते .पक्षाने आम्हाला डावलून , महानगरप्रमुख म्हणून आम्हाला काहीही न विचारता माजी आमदार अनिल गोटे यांना आमच्या माथी मारले.त्यांना उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे मी खूप नाराज झालो असल्याचे शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे महानगरप्रमुख डॉ सुशील महाजन यांनी काल शुक्रवारी २५ ऑक्टोंबरला सकाळी देवपुरातील सिद्धी हॉस्पिटलसमोरील शिवालय या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले .
तसेच सोमवारी २८ ऑक्टोंबरला मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार आहे. मात्र ही बंडखोरी नव्हे तर नाराजी असल्याचेही डॉ.महाजन यांनी स्पष्ट केले. शिवसेना म्हणजे एक कुटुंब आहे त्यामुळे पक्षाने माजी आमदार गोटे यांना उमेदवारी देताना मला सांगणे आवश्यक होते. मला धुळे मतदारसंघातून उमेदवारी करायची होती.यासाठी मी गेल्या दोन महिन्यात सात ते आठ वेळेस मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळ मिळाली नाही. शिवसेनेने नवीन आलेल्या लोकांना डोक्यावर बसविले .एका सर्व्हेच्या आधारावर गोटे यांना उमेदवारी दिली गेली.मात्र अशा सर्व्हवर शंका आहे यापूर्वीच्या निवडणुकांमध्येदेखील निष्ठावान शिवसैनिकांना अशाच प्रकारे डावलेले गेले आहे.योग्य माहिती योग्य प्रकारे वर पोहोचविली जात नाही.त्यामुळे माझ्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचे डॉ.महाजन यांनी सांगितले .डॉ महाजन यांनी धुळे शहर विधानसभा निवडणूक हे लक्ष्य मानत त्या दिशेने यशस्वी वाटचालही सुरू केली होती. शिवसेनेचे महानगरप्रमुख या महत्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ.महाजन यांच्याकडे धुळे शहरातील जनता उद्योन्मुख नेतृत्व म्हणून आशेने पाहते .डॉ.महाजन यांची धुळे शहर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दिशेने भरभक्कम वाटचालही सुरू आहे.त्यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकहीदेखील तयार आहेत.तसेच आपल्या कामातून जो जनसंपर्क त्यांनी उभा केला आहे ते पक्षापलीकडील मोठी फौजदेखील डॉ.महाजन यांना निवडून आणण्यासाठी तत्पर झालेले आहे. विधानसभेत महाविकास आघाडीकडून त्यांनी नेतृत्व करावे हीच सर्वसामान्य शिवसैनिकांची मागणी आहे. २०१९ विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी मेहनत केली होती.मात्र वरिष्ठ पातळीवरून एनवेळी शिवसेनेचेसह संपर्कप्रमुख हिलाल माळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली . तेव्हादेखील कुठलेही का - कु न करता डॉ.सुशील महाजन यांनी पक्ष आदेश मानले .तसेच पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपल्या जीवाचे रान केले.त्या निवडणुकीनंतरदेखील नाराज न होता तेवढ्यात जोमाने कामाला लागले व शिवसेना वाढवण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली .कधीच कोणावर टीका -टिप्पणी न करता लोककल्याणकारी कामासाठी ते प्रयत्नशील असतात.अनेक वेळेस रस्त्यावरची लढाई रस्त्यावरून उतरून त्यांनी प्रशासनातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला आहे. हे सर्व करीत असताना आपली क्लीन इमेजदेखील त्यांनी जोपासलेली आहे.अशा प्रामाणिक व कट्टर शिवसैनिकाला जर धुळे शहर विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेत डावलले जात असेल तर सर्वसामान्य शिवसैनिकांना ही बाब निश्चितच खटकणारी आहे. गेल्या १३ वर्षापासून रात्रंदिवस मेहनत करून संकटाच्या काळात देखील शिवसेना फुटणार नाही ती तेवढ्यात भक्कमपणे उभी राहील ,याची सर्व काळजी घेऊन जर शिवसेना डॉ.महाजन यांना डावलत असेल तर शिवसेनेप्रति समाजमनातदेखील चुकीची भावना पसरेल हे तेवढेच सत्य .डॉ.सुशील महाजन यांच्यासारख्या कट्टर व प्रामाणिक शिवसैनिकांवर होणारा अन्याय शिवसैनिक व धुळेकर खपवून घेणार नाही .या नाराजीचा फटका शिवसेनेसह महाविकास आघाडीला बसेल, असेच चित्र सद्यातरी तयार झाले आहे .

Social Plugin