एकतर्फी सामन्यात डिजिटल युट्युब मीडिया ३९ धावांनी विजयी सामनावीर काशिनाथच्या ३१ चेंडूत ८६ धावा, रिजवानचे तीन बळी ठरले महत्वाचे

 



जळगाव :  पत्रकार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये द्वितीय सामना डिजिटल युट्युब मीडिया विरुद्ध प्रेस फोटोग्राफर यांच्यात झाला. या सामन्यात युट्युब मीडियाने ३९ धावांनी विजय मिळवला. 



सामनावीर काशिनाथ चव्हाण यांनी ३१ चेंडूत केलेली ८६ धावांची खेळी आणि रिजवान इलाही यांनी २ षटकात १९ धावा देऊन घेतलेले ३ बळी व २ झेल सामन्यात डिजिटल युट्युब टीमसाठी महत्त्वाचे ठरले. नाणेफेक जिंकून प्रेस फोटोग्राफर संघाचे कर्णधार संधिपाल वानखेडे यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला. प्रथम फलंदाजी करताना डिजिटल युट्युब मीडियाच्या सलामीवीर फलंदाजांनी सुरुवात चांगली केली. रिजवान फलाही केवळ १ चौकार मारून आऊट झाला. त्यानंतर सुरुवात चांगले केल्यावर मात्र १० चेंडूत १३ धावा काढून धर्मेंद्र राजपूत बाद झाला.


यानंतर मात्र शतकीय भागीदारी करत नाबाद राहून १३१ चेंडूत ११ षटकार व ४ चौकारांच्या मदतीने काशिनाथ चव्हाण यांनी धुवाधार ८६ धावांची खेळी केली. त्याला ९ चेंडूत २१ धावा करून आशुतोष हजारे याने साथ दिली. 


८ षटकात १३५ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या प्रेस फोटोग्राफर संघाची सुरुवात चांगली झाली. भूषण हंसकर याने पहिल्या षटकात पहिल्या ४ चेंडूवर ४ षटकार ठोकले. मात्र गोलंदाज व कर्णधार विश्वजीत चौधरी यांच्या पुढील चेंडूवर त्याला झेलबाद व्हावे लागले. यानंतर मात्र धावांची गती थोडी मंदावली. अखेरच्या षटकापर्यंत प्रेस फोटोग्राफर ५ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ९५ धावा करू शकल्या.


सर्वाधिक धावा १९ चेंडूत ४१ अभिषेक मकासरे याने तर ५ चेंडूत २४ धावा भूषण हंसकर यांनी काढल्या. काशिनाथ चव्हाण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.