विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचा प्रशासनाला बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा.



स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  साजरा होवूनही कापडणेतील  आदिवासी भिल्ल समाज नागरी सुविधांपासून वंचित आहे.तेथे रस्ते नाहीत, गटारी नाहीत,नागरी  सुविधांची कामे झालेली नाहीत . या वस्त्यांपर्यंत शासकीय योजनाही पोहचत नाही . शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी नेहमीच आदिवासी वस्तीकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात.

आदिवासींचा उपयोग फक्त मतदानापुरताच करायचा का? असा रास्त सवाल एकलव्य संघटनेने विचारला आहे. संघटनेच्या उपाध्यक्ष मयुरी सोनवणे यांच्या नेतृत्वात आदिवासी भगिनींनी कलेक्टर कचेरीवर निदर्शने केलीत.तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.शिवाय, आदिवासींच्या मागण्या पंधरा दिवसांत मान्य न झाल्यास बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा देण्यात आला.या निवेदनात म्हटले आहे की,कापडणे गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी भिल्ल समाज आहे.

या समाजाला घरकुल योजनांचा लाभ मिळत नाही , रस्ते ,गटारी  अशा मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. आदिवासी वस्त्यांमध्ये लाईट आणि पाण्याची सोय नसल्याने हाल होतात. शिवाय बऱ्याच जणांना अद्याप  रेशनकार्ड  मिळालेले नाही.या भागाकडे कायमच लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. वास्तविक , कापडणे गावात अनेक नामवंत राजकीय पुढारी राहतात.ते मुद्दाम आदिवासींकडे दुर्लक्ष करतात का? असा सवालही एकलव्य संघटनेने विचारला आहे . आदिवासींच्या समस्या येत्या १५ दिवसांत न सोडविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बिऱ्हाड आंदोलन पुकारले जाईल. असा इशाराही  देण्यात आला.कालच्या आंदोलनात एकलव्य संघटनेच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मयुरी सोनवणे ,सीमा भील,मंगल भील, आशाबाई भील, दिलीप मालचे , कमल सूर्यवंशी, रवी बोरसे,प्रवीण ढकेर ,भालेराव भील,अनिता ढकेर ,इंदुबाई भील,मंगल पवार, वैशाली भील,सुशीला भील ,सुनीता भील ,शांताबाई भील आदी सहभागी झाले होते.