जळगाव, दि. १४ मे २०२५ – सार्वजनिक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आज महाबळ जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महाराजांची जयंती अत्यंत प्रेरणादायी व शिवभक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सौ. स्मिताताई वाघ होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार व समितीचे अध्यक्ष मा. राजू मामा भोळे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे समन्वयक श्री. शंभू अण्णा पाटील यांनी आपल्या भाषणात जळगाव शहरात अद्यापही छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अथवा पुतळा नसल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. आजच्या पिढीला प्रेरणा देणारे असे भव्य स्मारक निर्माण व्हावे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन जळगाव शहरात वर्षभराच्या आत छ. संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सुरवात करणारच अशी मोठी घोषणा केली. स्मारकाच्या कामासाठी ना. गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम व भव्य स्मारक उभारले जाईल. हे आमचे शिवप्रेमी आणि जळगावकर जनतेला दिलेले वचन आहे, अशा शब्दात आ. राजू मामा भोळे यांनी भावना व्यक्त केल्या.
राजू मामांच्या या घोषणेनंतर उपस्थित जनसमुदायाकडून जोरदार टाळ्यांचा गजर आणि “छत्रपती संभाजी महाराज की जय” च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ यांनीही शंभू पाटालांनी व्यक्त केलेली खंत महत्वाची असून संभाजी राजेंचे स्मारक जळगाव शहरात निर्माण व्हावे, तसेच याकामी स्वतः लक्ष घालणार आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच अरविंदभाऊ देशमुख यांनी स्वतःच्या घरी स्थापना करण्यासाठी पुणे येथून खास बनवून आणलेल्या संभाजी महाराजांच्या सजीवदर्शी पुतळ्याचे सर्वांनी दर्शनही घेतले.
या प्रेरणादायी कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात समितीचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख, कैलास आप्पा सोनवणे, डीवायएसपी श्री. संदीप गावित, सचिव प्रमोद बळीराम पाटील, विष्णू भाऊ भंगाळे, दीपकभाऊ सूर्यवंशी, गनीभाई मेमन, इंजी. विनोद पाटील,पुरुषोत्तम आबा चौधरी, विनोद भाऊ देशमुख, पत्रकार दिलीप तिवारी, अनंत (बंटी) जोशी, जमीलभाई देशपांडे, मुकुंद भाऊ सपकाळे, प्रफुल्ल पाटील,दिलीप भाऊ सपकाळे, राजेंद्र देशमुख सर, सुरेंद्र पाटील, अजयकुमार पाटील,योगेश पाटील,राहुल पाटील, आकाश हिवाळे, शुभम अहिरे, अनिल नन्नवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व समारोप
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडला. यशस्वीतेसाठी सचिव प्रमोद बळीराम पाटील, योगेश पाटील, शुभम अहिरे, अनिल नन्नवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक संयोजन केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर व शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांच्या कार्याचा गौरव करत भविष्यातील स्मारकाच्या उभारणीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा कार्यक्रम केवळ एक उत्सव नव्हता, तर तो होता शिवसंस्कृती, राष्ट्रभक्ती आणि इतिहास जागवण्याचे प्रेरणादायी संदेश देणारे पर्व. स्मारक उभारणीच्या वचनामुळे या वर्षीच्या जयंती उत्सवाला एक वेगळेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.


Social Plugin