बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण नवीन अपॉइंटमेंट प्रणाली लागू



जळगाव, १ जुलै: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे संच वितरणासाठी आता नवीन अपॉइंटमेंट प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीनुसार, कामगारांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.


मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरू झाली आहे, तर १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास प्रारंभ होणार आहे.


या उपक्रमाचा उद्देश बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या गृहपयोगी वस्तू सहज उपलब्ध करून देणे आहे. मंडळाने यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय वितरण केंद्रे निश्चित केली आहेत. नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या जिल्ह्याच्या वितरण केंद्रातूनच हा संच प्राप्त करता येईल.


अशी असेल नोंदणी प्रक्रिया:


बांधकाम कामगारांना प्रथम मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग-इन करायचे आहे.

नोंदणी निष्क्रिय असल्यास किंवा यापूर्वी संच घेतलेला असल्यास, कामगार योजनेस अपात्र ठरतील.

पात्र कामगार आपल्या सोयीनुसार तारीख आणि वितरण केंद्र निवडू शकतात.

त्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळेल. हे पत्र, आधार कार्ड किंवा मंडळाचे ओळखपत्र सोबत घेऊन निवडलेल्या दिवशी वितरण केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

केंद्रावर बायोमेट्रिक ओळख आणि ऑनलाइन फोटो घेण्यात येईल, त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच कामगाराला दिला जाईल.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, एका कुटुंबातील (पती किंवा पत्नी) एका सदस्यालाच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, प्रत्येक केंद्रावर दररोज २५० लाभार्थ्यांना संच वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत अपॉइंटमेंट लेटरशिवाय संच वितरण केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.


ही वितरण प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून, कोणत्याही स्वरूपात शुल्क किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंडळाने दिला आहे. वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर मंडळाचे प्रतिनिधी आणि नियुक्त संस्थेचे अधिकारी कार्यरत असतील.


या संदर्भात अधिक माहिती आणि अपॉइंटमेंटसाठी http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.