स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – मेहरुण परिसरातून अंमली पदार्थ जप्त, दोन इसम अटकेत.

 




 स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने मेहरुण परिसरात अंमली पदार्थ विक्री करणार्‍या एका इसमाला रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत स्फटीक मेथ एम्फेटामाईन सदृश ६ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (किंमत सुमारे ६०,००० रुपये) आणि दोन मोबाईल फोन (२२,००० रुपये किंमतीचे) हस्तगत करण्यात आले आहेत.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की,  दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मेहरुण येथील जे.के. पार्क स्विमिंग पुलाजवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा. अकरम शेख यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना कळवले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड व सपोनि गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईत मेहमुद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यास पकडण्यात आले. चौकशीत त्याने हा अंमली पदार्थ अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक, मेहरुण) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनि. चंद्रकांत धनके व पो.शि. योगेश घुगे करीत आहेत.


 सुरत कनेक्शन उघड


याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत पोलिसांकडून वाँटेड असलेला नाझीम रशीद कुरेशी (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यालाही ताब्यात घेऊन सुरत सिटी क्राइम ब्रँचकडे सोपवले. दोन आठवडे पूर्वी सुरत येथे १९८ ग्रॅम एम्फेटामाईन जप्त झाले होते, त्यात कुरेशी फरार होता.


 पोलीसांचे आवाहन


जळगाव पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव व ओळख गुप्त ठेवली जाईल.


कारवाईत सहभागी अधिकारी

ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक) व मा. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि गणेश वाघ, पो.उपनि. शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पो.हवा. अकरम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, सलीम तडवी, पो.ना. किशोर पाटील, पो.शि. गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, रविंद्र चौधरी व चा.पो.शि. महेश सोमवंशी यांचा समावेश होता.


 स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे