जळगाव : शहराच्या मध्यवर्ती आकाशवाणी चौकापासून ते महाबळ चौकापर्यंतचा मुख्य रस्ता आज पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी मांडलेल्या गाड्या, भाजीविक्रेते, वडापाव-पाणीपुरी स्टॉल्स आणि रसवंती गृहांनी रस्त्याचा अर्धा भाग व्यापून टाकला असून, वाहतुकीची दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना सकाळ-संध्याकाळ पायी चालणेही कठीण झाले आहे.
सागर पार्क समोर पेट्रोल पंपाजवळ, अल्पबचत भवन, DYSP निवासस्थान, भाऊंचे उद्यान, हतनूर कॉलनी, पशुवैद्यकीय दवाखाना – या सर्व ठिकाणी अतिक्रमण इतक्या प्रमाणात वाढले आहे की, अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
काव्यरत्नावली चौकात तर भर चौकातच भाजीविक्रेते बसतात, परिणामी वाहतूक कोंडी आणि गोंधळ शिगेला पोहोचला आहे.
नागरिक संतापाने म्हणत आहेत की, “काही अतिक्रमणधारकांना स्थानिक कर्मचाऱ्यांचेच अप्रत्यक्ष पाठबळ आहे. त्यामुळेच प्रशासन निष्क्रिय दिसतंय.”
महत्त्वाचे म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, पोलिस अधीक्षकांचे कार्यालय, RTO अशा महत्त्वाच्या प्रशासकीय संस्थांच्या मार्गावरच ही अराजक स्थिती निर्माण झाली आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमेला काळी छटा देणारे आहे.
नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण तातडीने हटवावे आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
“शहराचा श्वास घोटणारे अतिक्रमण – हटवा नाहीतर जनआंदोलन पेटेल!” असा इशाराही देण्यात आला आहे.

Social Plugin