जळगाव : गोरगरीब कुटुंबांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा यासाठी सरकारने सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या योजनेत साखर, तेल, रवा, मैदा, हरभरा डाळ इत्यादी वस्तू फक्त १०० रुपयांत मिळत असल्याने गरीबांना दिलासा मिळत होता. मात्र गेल्या वर्षभरापासून या योजनेचा लाभ नाकारण्यात आल्याने सामान्य जनतेत नाराजी पसरली आहे. “निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना आणण्यात आली होती का? की खरंच गरीबांच्या हितासाठी होती?” असा प्रश्नही मनसेने उपस्थित केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धान्याची व संसारोपयोगी वस्तूंची नासधूस झाली आहे. अशा कठीण काळात ‘आनंदाचा शिधा’ योजना हा गरिबांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. त्यामुळे दिवाळीपूर्वी तातडीने निधी उपलब्ध करून ही योजना राबवावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
या निवेदनावर विनोद शिंदे (महानगराध्यक्ष), अविनाश पाटील (जिल्हाध्यक्ष – मनसे शेतकरी सेना), ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, अनीता कापुरे, लक्ष्मी भिल, विलास सोनार, मनोज लोहार व हर्षल वाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Social Plugin