अवैध गांजा वाहतूक करणारे दोन इसम स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

 


जळगाव प्रतिनिधी :

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण परिसरात मोठी कारवाई करत अवैध गांजा वाहतूक करणारे दोन इसमांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ किलो १२० ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख २८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सत्रासेन ते चोपडा या रस्त्यावरून दोन इसम मोटारसायकलवर गांजा वाहतूक करणार आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सत्रासेन-चोपडा रोडवर सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली.


तपासणीदरम्यान संशयित मोटारसायकल क्रमांक MP-46-MV-2951 अडवून तपासली असता, त्या मोटारसायकलवर गांजा वाहतूक करणारे दोघे इसम आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अविनाश साहेबराव डिवरे (वय २६) रा. खोकरी, ता. वरला, जिल्हा बडवाणी, रोशन साहेबराव डिवरे (वय ३१) रा. खोकरी, ता. वरला, जिल्हा बडवाणी अशी सांगितली. त्यांच्या ताब्यातून ०८ किलो १२० ग्रॅम गांजा, होंडा कंपनीची मोटारसायकल, मोबाईल फोन, असा एकूण २ लाख २८ हजार ६४० रुपये किंमतीचा  मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपींवर NDPS Act कलम २०(ब), २२ अंतर्गत CCTNS क्र. ०२५६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


सदर कारवाईत स.पो.नि. शेषराव नितनवरे, पो.निरी. जितेंद्र वल्टे, पोह. दिपक माळो, पोह. रविंद्र पाटील, पोह. विलेश सोनवणे, पो.कॉ. रावसाहेब पाटील, तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोह. राकेश पाटील, पो.कॉ. मनेष गावीत, प्रमोद पवार, तिरुपती खांडेकर, किरण पारधी यांचा सहभाग होता.या कारवाईमुळे अंमली पदार्थ विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.