जळगाव : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान देशाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा निषेधार्ह प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यात आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले.
या वेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, न्यायव्यवस्थेवर झालेला हा हल्ला हा राष्ट्राच्या आत्म्यावर झालेला हल्ला असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच ही घटना संविधानाचा अपमान असल्यामुळे संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनादरम्यान जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी सांगितले की, “न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे थेट संविधानाचा व लोकशाहीचा अपमान आहे. असा भ्याड प्रकार कधीही सहन केला जाणार नाही. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
या वेळी आझाद समाज पार्टीचे युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी सो, जळगाव यांच्याकडे अधिकृतरीत्या निवेदन सादर करण्यात आले.

Social Plugin