कॉफी शॉपवर रामानंदनगर पोलिसांचा छापा

 


जळगाव – रामानंद नगर पोलिसांनी बुधवारी दुपारी शहरातील एका कॉफी शॉपवर छापा टाकून संशयित वर्तनावर कारवाई केली. या प्रकरणी कॅफे चालवणाऱ्या मयुर धोंडू राठोड (वय २५, रा. कोल्हे हिल्स) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील गोल्ड जीमसमोर ‘चॅट अड्डा’ नावाने एका गाळ्यात कॅफे सुरू होता. या ठिकाणी प्लायवुडचे कंपार्टमेंट तयार करून त्यावर पडदे लावण्यात आले होते, ज्यामुळे कपल्ससाठी खासगीपणा राखण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या संशयित कारभाराबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्यासह पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुधाकर अंभोरे, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी आणि योगेश बारी यांनी छापा टाकला. तपासणी दरम्यान पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तसेच, कॉफी शॉपचा अधिकृत परवाना देखील नसल्याचे उघड झाले. घटनास्थळी काही युवक-युवती आढळून आले असून, त्यांना समज देऊन सोडण्यात आले.


या प्रकरणी कॅफे मालक मयुर राठोड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, रामानंद नगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.