समता नगर परिसरात समता समाज मित्र मंडळ तसेच ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने 75 व्या भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकशाही मूल्यांची जनजागृती आणि विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम परिसरात विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान निर्मितीतील त्यांच्या महान योगदानास अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, सामाजिक न्यायाची जाण आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीची प्रेरणा आजच्या पिढीला किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला.
यानंतर मुख्य कार्यक्रमात परिसरातील 75 विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हक्क, कर्तव्ये, समता, बंधुता, राष्ट्रीय एकता आणि लोकशाहीचे मूल्य दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून
जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे,माजी नगरसेवक नितीन बरडे,रिपाई (आठवले गट) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजप मंडळ क्र. 3 चे अध्यक्ष अजित राणे,सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर नितीश कैलास कापडणे,भाजप मंडळ उपाध्यक्ष श्याम पाटील उपस्थित होते.
मान्यवरांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना समाजातील सकारात्मक बदलासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांची भाषणे प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जागवणारी ठरली.
कार्यक्रमाची यशस्वीता साधण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे राजू साळुंखे, सचिन अडकमोल, किरण अडकमोल, प्रताप बनसोडे, बबू शिंदे, शंकर सोनवणे आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले. परिसरातील रहिवाशांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---
संविधान वाटप सोहळ्यानंतर ‘संघर्ष चौक’चे उद्घाटन
संविधान दिन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर समता नगरातील ‘संघर्ष चौक’चे देखील उद्घाटन करण्यात आले. हा ऐतिहासिक आणि सामाजिक संदेश देणारा चौक परिसरातील ऐक्य, प्रगती आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या सामाजिक आंदोलनांचे प्रतिक म्हणून ओळखला जाणार आहे.
या चौकाचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे, अनिल अडकमोल, आणि सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर नितीश कैलास कापडणे यांच्या हस्ते संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांनी या चौकाच्या माध्यमातून पुढील पिढीला प्रेरणा देणारी ऐतिहासिक जाणीव जपली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
---
कार्यक्रमाच्या शेवटी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधानाचा आत्मा जपत समाजात शांतता, समता आणि बंधुतेचा संदेश देण्याची कर्तव्यनिष्ठ भावना यावेळी सर्वांनी दृढ केली.






Social Plugin