जळगाव (प्रतिनिधी) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असताना, या विकासाचा प्रत्यक्ष अनुभव जळगावकरांना देण्यासाठी ‘प्रगतीशिल महाराष्ट्र २०२५’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. ३ ते बुधवार दि. ५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ-जीएस ग्राऊंडवर हे प्रदर्शन होणार असून, सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजू भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, किशोर पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि अमोल जावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाचे आयोजन दिल्लीतील फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन या संस्थेने केंद्र सरकारच्या जनजागरण मोहिमेअंतर्गत केले असून ‘एक उन्नत राष्ट्र की और...’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे. पत्रकार परिषदेत खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू भोळे आणि अखिला श्रीनिवासन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या प्रदर्शनात केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे स्टॉल्स असतील. कृषी, ग्रामीण विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, आयुष, मत्स्यपालन, भारतीय मानक ब्युरो, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाऊर्जा, भारतीय लघु उद्योग विकास बँक, जळगाव महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-इनक्युबेशन सेंटर यांसह अनेक विभाग यात सहभागी आहेत.
या प्रदर्शनात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शोध प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवकल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे. विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
जळगाव शहरात प्रथमच अशा पद्धतीचे प्रदर्शन आयोजित होत असून, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या प्रदर्शनाला जळगावकरांनी नक्की भेट द्यावी, असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार राजू भोळे यांनी केले.


Social Plugin