निकम परिवाराचा वारसा आणि नव्या पिढीचा चेहरा : प्रभाग ९ मध्ये रितेश निकम चर्चेत.

 

जळगाव | प्रतिनिधी

आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने रितेश निकम यांनी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत उमेदवारीसाठी मागणी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला असून, नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

निकम परिवार हे राज्य व जिल्ह्यात परिचित नाव आहे. रितेश निकम हे माजी आमदार कै. दादासाहेब बॅरिस्टर निकम यांचे नातू असून, सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची परंपरा आजही कायम आहे. त्यांचे वडील कै. दिलीपभाई निकम व आई मातोश्री शैलजाताई निकम यांनी मार्केटिंग फेडरेशन, कॉटन फेडरेशन, कृभको, जिल्हा बँक तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.

रितेश निकम हे ज्येष्ठ विधिज्ञ व विद्यमान राज्यसभा खासदार पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे पुतणे असून, त्यांचे थोरले बंधू रोहित दादा निकम हे भाजपा महाराष्ट्र राज्य सहकार आघाडीचे उपाध्यक्ष आहेत. तसेच ते जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक, जळगाव जिल्हा औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष व पणन महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

रितेश निकम यांनी बी.ई. (कॉम्प्युटर) ही पदवी प्राप्त केली असून, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात ते सक्रिय आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजहितासाठी सातत्याने कार्य केले आहे.

प्रभाग क्रमांक ९ हा एस.एम.आय.टी. कॉलेजपासून निमखेडी शिवारापर्यंत विस्तारित असून, या भागात रस्ते, भुयारी गटार व्यवस्था, सांडपाणी नियोजन, वस्त्यांतील अंतर्गत रस्ते, उद्याने व सामाजिक सभागृहे यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांची आवश्यकता आहे. जेष्ठ नागरिक, महिला, तरुण, बचत गट तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे.

या प्रभागात बारा बलुतेदार समाजासह बहुजन समाजातील विविध घटक गुण्यागोविंदाने वास्तव्यास असून, सर्व समाजघटकांच्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मधून रितेश निकम यांना चांगली पसंती मिळत असून, त्यांच्या नावाची चर्चा नागरिकांमध्ये सकारात्मक पद्धतीने सुरू असल्याचे चित्र आहे.