अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांना प्रशासनाचा जलद प्रतिसाद पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली निवास–भोजन–उपचार व सुरक्षित परतीची व्यवस्था युद्धपातळीवर

 


जळगाव प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या–प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविक जखमी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ मदतकार्याला सुरुवात केली. जखमी आणि सुरक्षित सर्व भाविकांच्या परतीसाठी रेल्वेची स्वतंत्र रिझर्वेशन बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला जखमी भाविकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जळगाव जिल्हा प्रशासन, सुलतानपूर प्रशासन, लखनऊ रेल्वे विभाग, भुसावळ मध्य रेल्वे विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी तातडीने समन्वय साधून व्यवस्था केली.

जखमी व सुरक्षित भाविकांसाठी निवास, भोजन आणि उपचारांची सोय करण्यात आली. त्यांना सुरक्षितपणे विशेष रिझर्वेशन बोगीपर्यंत पोहोचविण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ समन्वय साधत मदतकार्य पाहत आहेत.

अपघातात पिंप्राळा, जळगाव येथील छोटीबाई शरद पाटील (55) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह जळगावला आणण्यासाठी प्रशासनाने ॲम्बुलन्सची व्यवस्था केली असून दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जखमी भाविकांवर सुलतानपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार झाला असून आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. भाविकांची परतीची यात्रा सुरू असून ते उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत जळगाव व भुसावळ रेल्वे स्थानकात दाखल होणार आहेत. धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी भाविकांच्या सुरक्षित घरी परतण्यावर सतत लक्ष ठेवून आहेत.