जळगावमध्ये सोशल मीडियावर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात झाले आहे. इन्स्टाग्रामवरील ‘रिल’मध्ये केलेल्या शिवीगाळीचा राग मनात ठेवून १९ वर्षीय तुषार तायडे याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या धक्कादायक प्रकरणातील पाच संशयितांना न्यायालयाने १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
समतानगरातील तुषार तायडे याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यातील आक्षेपार्ह शब्दांचा बदला घेण्यासाठी आरोपींनी एकत्र येत कट रचला. मंगळवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी बोरावलजवळील पाटचारी परिसरात तुषार दुचाकीवरून जात असताना, आरोपींनी त्याला अडवून लाठ्या-काठ्यांनी निर्दय मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी विक्रम पंडित सोनवणे, अविनाश सोनवणे (सुजदे), निलेश कोळी (बोरनार), कल्पेश इंगळे (आसोदा), विजय सोनवणे (सुजदे) यांच्यासह पाच संशयितांना ताब्यात घेतले.
गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर तपासाची गरज, पुरावे गोळा करणे आणि वापरलेल्या हत्यारांचे जप्ती यासाठी न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

Social Plugin