प्रभाग 3 ‘अ’ मधील अपक्ष उमेदवार सौ. मीना धुडकू सपकाळे यांना वाढता प्रतिसाद महारॅलीद्वारे दाखवला जनतेचा विश्वास


जळगाव (प्रतिनिधी):

प्रभाग क्रमांक 3 ‘अ’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या सौ. मीना धुडकू सपकाळे (अनुक्रमांक 5, निशाणी – कपबशी) यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या महारॅलीतून जनतेचा स्पष्ट पाठिंबा दिसून येत आहे.

सौ. मीना धुडकू सपकाळे या मागील टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या माजी नगरसेविका आहेत. त्या कामगार नेते धुडकू सपकाळे यांच्या पत्नी असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील विविध मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते.

यावेळी भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतरही त्यांनी खचून न जाता थेट जनतेच्या विश्वासावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ही लढाई आता केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता वर्चस्वाची आणि विश्वासाची लढाई बनल्याचे चित्र आहे.

या प्रभागात त्यांच्या विरोधात अर्चना संजय पाटील या निवडणूक रिंगणात असल्या, तरी सौ. मीना धुडकू सपकाळे यांना नागरिकांकडून अधिक प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महारॅलीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, “काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी” अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत होती. वाढता जनसंपर्क, जुना विश्वास आणि अपक्ष लढतीची धार यामुळे सौ. मीना धुडकू सपकाळे यांची उमेदवारी अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.