बाफना ज्वेलर्समध्ये चोरी; आंतरराज्यीय आरोपी जेरबंद, सोन्याची लगड हस्तगत

 


जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील सुभाष चौक येथील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अँड सन्स) येथे ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची साखळी चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या सोन्याची बनवलेली लगड (Gold Ingot) हस्तगत करण्यात आली असून, गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी आरोपीने सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (किंमत अंदाजे २,४९,६१५ रुपये) चोरली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे BNS कलम ३०५ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून भास्कर किसन बानोथ (वय २२, रा. तेलंगणा) याला अटक केली. चौकशीत आरोपीने चोरीची साखळी वितळवून लगड बनवल्याची कबुली दिली.

आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.