जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरणारी महत्त्वाची बातमी समोर आली असून, रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय एकनाथ शेलार यांना सन २०२६ चे मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत व निष्कलंक सेवेचा हा सन्मान मानला जात आहे.
पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे जिवंत उदाहरण म्हणून श्री. शेलार यांची ओळख आहे. त्यांच्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या असून त्यांच्या कामगिरीची दखल वेळोवेळी घेण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांच्या ३५ वर्षांच्या सेवेत त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल तब्बल २४२ बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले आहे.
तितकेच उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात एकही शिक्षा, दंड किंवा ताकीद नसलेला निष्कलंक सेवा रेकॉर्ड त्यांनी जपला आहे. तसेच, ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी कधीही ‘सिक रजा’ घेतलेली नसून, आरोग्याविषयी जागरूकता आणि कर्तव्यावरील निष्ठा याचे हे दुर्मिळ उदाहरण मानले जात आहे.
त्यांच्या या शिस्तप्रिय, समर्पित व उल्लेखनीय सेवेची दखल घेत भारत सरकारने २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या सन्मानामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी तसेच नागरिकांकडून श्री. शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Social Plugin