वंचितचे युवा महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल यांनी पोलीस झाल्याबद्दल आनंद तायडे यांचा सत्कार केला; म्हणाले – कठीण परिस्थितीवर मात करत मिळवले यश




जळगाव : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आनंद गंगाधर तायडे यांनी आपल्या आयुष्यातील मोठे स्वप्न साकार करत जळगाव पोलिस दलात यशस्वी निवड मिळवली आहे. नूतन कॉलेजमध्ये शिक्षण घेत त्यांनी बी.कॉम पदवी संपादन केली असून, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवत त्यांनी हे यश मिळवले आहे.

अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबातून येणाऱ्या आनंद यांच्या वडिलांचा व्यवसाय भाजीपाला विक्रीचा आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक संकटांचा सामना करत वाघ नगर येथील श्रीराम चौक परिसरात राहून त्यांनी आपले ध्येय गाठले. दिवस-रात्र अभ्यास, स्वतःवरील विश्वास आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे त्यांनी हे यश संपादन केले.

आनंद तायडे यांचे हे यश आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, "परिस्थिती कशीही असली तरी मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळते," याचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वंचितचे युवा महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल यांनी आनंद तायडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी आनंद यांच्या जिद्दीचे कौतुक करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यातही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कर्तव्य पार पाडण्याचा सल्ला दिला.