शहीद दिनी कोरोना योद्ध्यांचा पदयात्रा मोर्चा; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 


जळगाव :

शहीद दिनाच्या निमित्ताने कंत्राटी कोरोना योद्धा समितीच्या वतीने पदयात्रा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. मोर्च्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले.





या निवेदनात कोरोना काळात सेवा दिलेल्या अनुभवी कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमित सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, नियमित नोकरी मिळेपर्यंत दरमहा १० हजार रुपये “कोरोना योद्धा भत्ता” देण्याची मागणीही करण्यात आली.

याशिवाय, कोविडनंतर कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM/NRHM) व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये रिक्त पदांवर प्राधान्याने नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्मार्ट कंपनीमार्फत भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ही भरती तातडीने रद्द करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

तसेच, नवीन भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून कोरोना काळातील अनुभवी कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे, आणि शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा सेवेत घेण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

या पदयात्रा मोर्चात निलेश बोरा, बबन सावळे, जितेंद्र वाणी, यश कुमावत, प्रेमराज पाटील, प्रेम वानखेडे, प्रशांत सोनवणे, सागर बाविस्कर, भुषण पाटील, विनोद सपकाळे, कुणाल विसपुते, उज्वल गोयर, प्रेम मगरे, लीना करोसिया, रत्ना कोळी, मालती वाघ, अजय सैंदाणे, चंद्रशेखर पाटील, राहूल करोसिया, रविंद्र कोळी, शब्बीर खान, रेखा चांगरे, सीमा मोरे आदी सहभागी झाले होते.

कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या या योद्ध्यांच्या मागण्यांकडे प्रशासन सकारात्मक दृष्टीने पाहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.