पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निघृण खून; तिघे आरोपी अटकेत

चोपडा शहरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप महाजन हा आपल्या कुटुंबासह राहत होता. रविवारी (दि. १९ एप्रिल) रात्री तो कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडला होता. दरम्यान, रविवारी रात्री ९ वाजेपासून ते सोमवारी (दि. २० एप्रिल) सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान चोपडा शहरातील धरणाव रोडवरील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात जुना वाद आणि पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रदीपच्या चेहऱ्यावर व डोक्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात विजय भास्कर वैद्यकर, निर्मल संजय बडगुजर आणि चेतन सुभाष कांडे (सर्व रा. चोपडा) यांनी मिळून खून केल्याचे उघड झाले आहे.

चोपडा शहर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवत तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले हे करत आहेत.