बनावट कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हेंना सुप्रीम कोर्टाकडून जामीन.

 


जळगाव प्रतिनिधी | बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेले माजी महापौर ललित विजयराव कोल्हे यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ममुराबाद रोडवरील एल.के. फार्म येथे पोलिसांनी केलेल्या छाप्यात बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याचे उघड झाले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी जागेचे मालक असलेल्या ललित कोल्हे यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, कोल्हे यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली; मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नव्हता.

या काळात झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत कोल्हे यांनी उमेदवारी दाखल करून विजय मिळवला होता. अखेर जामीनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज त्यांना जामीन मंजूर केला.

या निर्णयामुळे कोल्हे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.