जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा खुर्द येथील उच्च व माध्यमिक विद्यालय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी गौरव मनोज खानचंदानी यांनी इयत्ता बारावी (HSC बोर्ड परीक्षा 2026) मध्ये 87.17 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गौरव यांचे वडील मोबाईल कव्हरचे छोटे दुकान चालवत असून अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांनी मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. आर्थिक अडचणी असूनही गौरव यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी गौरव यांनी JEE Main या देशातील प्रतिष्ठित परीक्षेत तब्बल 99.70 पर्सेंटाइल गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले होते. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असलेल्या या परीक्षेत एवढे उच्च गुण मिळवणे ही अत्यंत अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे.
गौरव यांच्या या दुहेरी यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Social Plugin