जळगावात ‘कूल रूफ सोल्युशन’चा शुभारंभ घरांतील तापमानात तब्बल १० अंशांनी घट; उष्णतेवर निसर्गाधारित उपाय प्रभावी

 


जळगाव : शहरातील वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी “महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्ग आधारित उपाय” या प्रकल्पांतर्गत ‘कूल रूफ सोल्युशन’ उपक्रमाचा शुभारंभ समता नगर (प्रभाग क्र. १२) येथे उत्साहात पार पडला. ऑल इंडिया डिझास्टर मेटिगेशन इन्स्टिट्यूट (AIDMI) अहमदाबाद यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत असून प्रॅक्टिकल ॲक्शन, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था (KVGPS) आणि जळगाव महानगरपालिका यांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेदहा वाजता झाली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांना प्रकल्पाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि भविष्यातील नियोजनाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते प्रकल्पाच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपआयुक्त पंकज गोसावी यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत पत्र्याच्या घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा डबल कोट देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० स्क्वेअर फुटांपर्यंत क्षेत्र असलेल्या १०० घरांची निवड करण्यात आली असून त्या घरांवर रंगकाम सुरू आहे. या विशेष रंगामुळे सूर्यकिरणांचे परावर्तन होऊन घरातील तापमान कमी राहते, हा या उपक्रमामागील मुख्य वैज्ञानिक आधार आहे.

कार्यक्रमादरम्यान रंग केलेल्या आणि न केलेल्या घरांमधील तापमान तपासण्यात आले असता तब्बल १० अंश सेल्सिअस इतका फरक आढळून आला. रंग केलेल्या घरांतील वातावरण लक्षणीयरीत्या थंड असल्याचे मान्यवरांनी अनुभवले. उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्वतः काही घरांचे तापमान तपासून प्रकल्पाच्या परिणामकारकतेची खात्री केली व उपक्रमाचे कौतुक केले.

लाभार्थींनीही या उपाययोजनेमुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. घरातील राहणीमान अधिक सुसह्य झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी प्रभाग क्र. १२ समतानगर येथील नगरसेवक नितीन बरडे, अनिल अडकमोल, उज्वला बेंडाळे आणि गायत्री राणे यांनीही प्रकल्पाची पाहणी करून उपक्रमाचे स्वागत केले.

प्रकल्पाचा पुढील टप्प्यात विस्तार करण्यात येणार असून समता नगर, तांबापुरा, पिंप्राळा हुडको, सुप्रीम कॉलनी तसेच इतर अधिकृत झोपडपट्टी भागांतील एकूण ४०० घरांना लाभ दिला जाणार आहे. याशिवाय ७० स्क्वेअर फुटांपर्यंत क्षेत्र असलेल्या सुमारे २०० छोट्या दुकानांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील यांचे प्रकल्प नियोजनात महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तीन वर्षांत उष्णता व पाणीटंचाई कमी करण्यासाठी विविध निसर्गाधारित उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी AIDMI चे टेक्निकल कोऑर्डिनेटर अमोल काळे, फिल्ड कोऑर्डिनेटर धीरज अंबिकार आणि शुभम शिरतुरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

एकूणच, ‘कूल रूफ सोल्युशन’ हा उपक्रम जळगावकरांसाठी उष्णतेविरुद्ध प्रभावी आणि दिलासादायक ठरत असून भविष्यात त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.